नवी दिल्ली : देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा (Maratha) जरूर बनेल, असं वक्तव्य रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत (AmarjitSingh Dullat) यांनी केलं आहे. दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अमरजीतसिंह दुल्लत म्हणाले की, पुढील पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठाच बनेल. आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा लागेल, असंही ते म्हणाले. संत नामदेव महाराजांचं काम विश्वव्यापी आहे. अशा महान संताच्या नावानं पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे, असंही ते म्हणाले.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि राँ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार दिला गेला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता पण पवार सोहळ्याला अनुपस्थित होते. पण जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अचानक या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही- राज्यपाल सत्यपाल मलिक
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, या देशातला शेतकरी अजाणतेपणी रोज गरीब होत असतो. तो जे पीकवतो ते धान्य दिवसेंदिवस स्वस्त आणि त्याच्या गरजेच्या वस्तू महाग होत चालल्यात. शेतकऱ्यांबद्दल माझं काम संपलेलं नाही. निवृत्त झाल्यानंतरही आवाज उठवत राहणार आहे, असं ते म्हणाले. सत्तेच्या नशेत गुंग असलेल्यांनी लक्षात ठेवा या देशातला शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, असंही मलिक म्हणाले. मलिक म्हणाले की, महाराष्ट्र शौर्य, लढाई, संघर्षासाठी ओळखला जातो तसंच संतांसाठीही ओळखला जातो. संत नामदेव पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य समजतो, असं मलिक म्हणाले.
देशाला भूक मारणार नाही तर द्वेष मारेल - फारुख अब्दुल्ला
यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं की, या देशाला भूक मारणार नाही तर द्वेष मारेल. भारताला प्रेमानं वाचवायचंय, मरणाआधी असा हिंदुस्थान पाहायचा आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 80 टक्के भारत शेतकरी आहे. आपण कधीकाळी जनावरांनाही खाऊ घालू नये असं अन्न खाल्लं आहे. मात्र इंदिरा गांधींनी हरितक्रांती केली आणि आपण जगभरात चांगलं अन्नधान्य देऊ लागलो.
हा पुरस्कार सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित पंजाबी व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. संत नामदेवांना शिख धर्मात मानाचे स्थान आहे संत नामदेव यांनी 23 वर्षे पंजाबमध्ये राहून तेथील लोकांना भक्ती संप्रदायाची शिकवण दिली. नामदेवांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आपला देह ठेवला असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय राष्ट्रीय कार्याबद्दल रुपये एक लाख एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha