नवी दिल्ली : राजस्थानच्या अलवरमध्ये गो तस्करीच्या सशंयावरुन अकबर नावाच्या व्यक्तीची कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. या प्रकरणात आता धक्कादायक बाब समोर आली आहे. घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी अकबरला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी गायींना गोशाळेत नेण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे.


अकरबरला जखमी अवस्थेत उपचाराची गरज असताना पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तसेच रस्त्यात त्यांनी चहाही प्यायल्याचा आरोप होत आहे.


घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अलवरच्या रामगडच्या हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनमधील रस्ता दिसत आहे. या व्हिडीओत एका रिकाम्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी जाताना दिसत आहे. पोलीस गायींना गोशाळेत सोडून येतानाच हा व्हिडीओ आहे. यावेळी अकबर पोलिसांच्या गाडीत नव्हता म्हणजे तो पोलीस स्टेशनमध्ये होता.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अकबर मारहाणीनंतर जिवंत होता. पोलिस ज्यावेळी त्याला घेऊन गेले त्यावेळी तो जखमी होता मात्र त्याचा श्वास सुरू होता. त्यामुळे पोलिसांवर संशय बळावला आहे.


काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या अलवरमध्ये दोन दिवसांपूर्वी गो तस्कर असल्याच्या संशयातून कथित गो रक्षकांनी अकबर नावाच्या व्यक्तीची मारहाण करुन हत्या केली होती. अलवरच्या रामगड परिसरातील लल्लावंडी गावातील ही घटना असून मृत अकबर हरयाणातील कोलागावचा रहिवासी होता.


अकबर आणि त्याचा मित्र शुक्रवारी रात्री दोन गायी घेऊन जात होते. लल्लावंडी गावाजवळ स्थानिक रहिवाशांनी अकबर आणि त्याच्या मित्राशी गायींवरुन वाद घातला आणि त्यांच्यावर हल्ला केला. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अकबर गंभीर जखमी झाला होता. मात्र काही तासांनतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.