अलाहाबाद : पत्नीसोबत लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन परतणाऱ्या तरुणाची चोरट्यांनी हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशात घडली होती. हत्या प्रकरणातील एका आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. पतीचे प्राण घेणाऱ्या आरोपीला पाहताच पत्नीचा धीर सुटला. त्या ढसाढसा रडायला लागल्या आणि 'यानेच गोळी झाडली, यानेच माझ्या नवऱ्याचा जीव घेतला' असा आक्रोश केला.

अलाहाबादमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय धीरज सिंह यांचा 1 जून रोजी लग्नाचा पाचवा वाढदिवस होता. ते पीडब्ल्यूडी विभागाचे कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. अॅनिव्हर्सरी निमित्त पीव्हीआरमध्ये चित्रपट पाहून रात्री 11 वाजताच्या सुमारास ते पत्नी रिद्धीसोबत कारमधून घरी येत होते. डिनर पॅक करण्यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली.

धीरज गाडीतून उतरुन जेवण पार्सल करण्यासाठी गेले, तर रिद्धी गाडीतच बसून होत्या. त्यावेळी अनुज अग्रवाल आणि पवन या दोन चोरट्यांनी त्यांच्या गाडीत प्रवेश केला आणि रिद्धीशी गैरवर्तन केलं. त्यामुळे रिद्धी यांनी आरडाओरड केली असता, ती ऐकून धीरज धावत गाडीजवळ आले.

त्यावेळी पवन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता, तर अनुज मागच्या सीटवर. गाडी पळवून नेण्याचा त्यांचा कट होता. मात्र धीरज यांनी गाडीसमोर येत ती अडवली आणि स्टिअरिंग पकडून कार बंद केली. त्यामुळे चिडलेल्या
अनुजने धीरज आणि रिद्धी या दोघांवरही गोळी झाडली.

गोळी रिद्धी यांच्या खांद्याला चाटून गेली, तर धीरज गंभीर जखमी झाले होते. रिद्धी धीरज यांना घेऊन ई-रिक्षाने एका खाजगी रुग्णालयात गेल्या. तिथून त्यांना एसआरएन रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी धीरज यांना मृत घोषित केलं.

रिद्धी यांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे क्राईम ब्रांचने आरोपींचं रेखाचित्र जारी केलं. त्यानुसार बुधवारी अनुजच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पतीचे प्राण घेणाऱ्या आरोपीला पाहताच रिद्धी यांचा धीर सुटला. त्या ढसाढसा रडायला लागल्या आणि 'यानेच गोळी झाडली, यानेच माझ्या नवऱ्याचा जीव घेतला' असा आक्रोश केला.