देहराडून : एकीकडे  बँक खात्यापासून मोबाईल नंबरपर्यंत सगळ्यासाठीच आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे आधार कार्डशी संबंधित अनेक घोळांची प्रकरणंही वाढत आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वारपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या खाटा गावात आधार क्रमाकांशी संबंधित नवा घोळ समोर आला आहे. आधार क्रमांकानुसार गावातील प्रत्येक नागरिकाचा जन्म 1 जानेवारीला झाला आहे.


आधार कार्डच्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खान यांची जन्मतारीख 1 जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचीही जन्मतारीख 1 जानेवारी आहे. एवढंच नाही तर अलफदीन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जन्मतारीखही 1 जानेवारी आहे. बरं हे प्रकरण इथेच थांबत नाही. या गावातील 800 कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा जन्म आधार कार्डनुसार 1 जानेवारी रोजी झाला आहे.

सर्व गावकऱ्यांनी आधार कार्डची नोंदणी करताना ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र दिलं होतं. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा समोर आला आहे. युनिक ओळख क्रमांक मिळेल, असं आम्हाला सांगितलं होतं. पण यात युनिक काय आहे? सगळ्यांची जन्मतारीख एकच छापली आहे, अशी प्रतिक्रिया अलफदीन यांनी दिली.

आधारशी संबंधित घोळाचं हे पहिलं प्रकरण नाही. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात आग्य्राच्या तीन गावातील आणि अलाहाबादच्या एका गावातील सगळ्यांची जन्मतारीखही 1 जानेवारी छापून आली होती.

जन्मतारीखच नाही पण लोकांचं जन्मवर्षही मतदान ओळखपत्र किंवा रेशनकार्डपेक्षा वेगळं आहे. काही वयस्कर नागरिकांचं वय 22 वर्ष छापण्यात आलं आहे तर मुलांचं वय 15 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंच छापलं आहे, असं स्थानिकांनी सांगितलं.

आधारमधील या घोळामुळे सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित तर राहणार नाही ना, याची चिंता आता गावकऱ्यांना सतावत आहे.