पुणे:  एचडीएफसी बँके डेबिट आणि क्रेडीट कार्डवरुन खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या इंधनावर 0.25% पासून 1% पर्यंत  चार्ज आकारणार आहे. त्यामुळे कोणतेही डेबिट अथवा क्रेडिट कार्ड पेट्रोल पंपावर न स्वीकारण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशनने घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेल वितरकांना मिळणाऱ्या मार्जिनमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही चार्जची तरतूद नाही. त्यामुळे हा वाढीव खर्च म्हणजे डिलर्ससाठी वाढीव नुकसान आहे. म्हणून पेट्रोल असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वास्तविक, या आधीपासूनच ग्राहकाला दिले जात असलेले 0.75% डिलर्सना परत मिळताना प्रमाणात मिळत नसून त्याचा हिशेब देखील दिला जात नाही. तेव्हा CIPD या राष्ट्रीय संघटनेच्या आदेशानुसार  दि 08 जानेवारी 2017 च्या मध्यरात्रीपासून पुढील तोडगा निघेपर्यंत पेट्रोल आणि डिझेल खरेदीची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड मार्फ़त स्विकारली जाणार नसल्याचे, ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशनच्या वतीने स्पष्ट केलं आहे.

एचडीएफसी बँकेने डेबिट अथवा क्रेडीट कार्डवर खरेदीसाठी स्वाईप मशिनवर नुकताच 1 टक्के कमिशन द्यावं लागणार असल्याचं बंधन सर्व पेट्रोल पंप चालकांवर घातलं आहे. या निर्णयामुळे एका बँकेने घेतलेला निर्णय इतरही बँका फॉलो करु शकतात. त्यामुळे जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत स्वाईप मशिनवर डेबिट आणि क्रेडीट कार्ड स्वीकारणार नसल्याचे फामफेडाचे अध्यक्ष उद्य लोध यांनी स्पष्ट केलं आहे.