नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक केली असून, शुमोन हक असं त्याचं नावं आहे. शुमोन बांगलादेश वंशाचा असून, त्याने ब्रिटिश नागरिकत्व मिळवले आहे. तो रोहिंग्या मुस्लिमांना दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


रोहिंग्या मुस्लिमांना दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यासाठी तो मिझोरम आणि मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचं एक तळ तयार करण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याचे प्रयत्न पूर्ण होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला शकरपूर परिसरातून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुमोनला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने आपण बिहारच्या किशनगंजचा रहिवासी असल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. शुमोनकडून एक पिस्तूल, 4 काडतूसं, लॅपटॉप, परदेशी चलन जप्त केलं आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं.

शुमोन ऊर्फ शमी उर रहमान 2013 मध्ये दक्षिण अफ्रिकामध्ये गेला होता. तिथं त्याने अल-कायदाचं स्थानिक कॅम्प जाईन केलं. यानंतर 2013-14 मध्ये तो सीरियात गेला. तिथे त्याने अल-कायदाचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर पुन्हा अलमुसरा फ्रंट जॉईन करुन, अल-कायदासाठी काम केलं.

पोलिसांनी सांगितलं की, तो यापूर्वी बांगलादेशातही गेला होती, जिथे त्याला अटक करण्यात आली होती. बांगलादेशातून तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अल-कायदाच्या कमांडरकडून मिळालेल्या सुचनेनुसार भारतात आला होता. भारतात राहून तो म्यानमारमधील लष्कराविरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण तळ उभारण्याच्या प्रयत्नात होता.

संबंधित बातम्या

रोहिंग्या मुस्लिमांचं भारतात राहणं धोकादायक, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर