लखनौ : गेल्या वर्षभरापासून देशाचं लक्ष लागलेली बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची ऐतिहासिक पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी बसपा आणि सपाच्या आघाडीची घोषणा केली आणि जागावाटपही जाहीर केलं.


मायावती आणि अखिलेश यादव यांची ही पत्रकार परिषद भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. मात्र या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधाला. या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही.


उत्तर प्रदेशात बसपा आणि सपा 38-38 जागा लढवणार आहेत. मात्र, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नसल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं. तर उरलेल्या दोन जागा मित्र पक्षांसाठी ठेवल्या आहेत. इतकंच काय तर पंतप्रधानपदासाठीही राहुल गांधीपेक्षा मायावतींना पसंती असल्याचं अखिलेश म्हणाले.


मायावती यांनी काँग्रेसला आघाडीत सहभागी न करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मोठा काळ देशाची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातच आणीबाणी लागली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची कार्यशैली एकसारखी आहे. बोफोर्स प्रकरणात काँग्रेसने सत्ता गमावाली होती आणि राफेलमुळे भाजप सरकार जाणार, असा घणाघात मायावतींनी केला.


आघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सर्व 80 जागांवर आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उत्तर प्रदेशात निवडणूक अभियान सुरु करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये 10 सभा घेणार आहेत. यासंबंधीच्या सूचना उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहेत. काल याबाबत एक बैठक झाली असून आज एक बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.


एबीपी न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार एपी आणि बीएसपी आघाडी झाली तर उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत त्यांना 50 हून अधिक जागा मिळू शकतात. तर एनडीएला 28 जागांवर यश मिळेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशात एनडीएमध्ये भाजप, अपना दल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांचा समावेश आहे. मात्र सध्या हे दोन्ही पक्ष भाजपवर नाराज आहेत.