दुबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भारतात सध्या असहिष्णुता खूप वाढली आहे. अशीच स्थिती राहिली तर भारताचा विकास कधीच होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी दुबईच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत, त्याठिकाणी ते बोलत होते.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या इंडो-अरब कार्यक्रमात काल राहुल गांधींनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. आगामी निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल आणि देशातील जनतेला पु्न्हा एकजुट करेन, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

मी आज दुबईचे शासक शेख मोहंमद यांना भेटलो. ते मला अतिशय नम्र वाटले, त्यांच्यात कसलाही अहंकार नव्हता. एक असा नेता जो लोकांचं ऐकतो आणि निर्णय घेतो ते म्हणजे शेख मोहंमद, अशा शब्दात राहुल गांधी यांनी दुबईचे शासक शेख यांची स्तुती केली. भारत आणि यूएईला एकत्र आणण्याचं काम एका सहिष्णू नेत्याने केलं, मात्र भारतात मागील साडेचार वर्षात असहिष्णुता खूप वाढली आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असही राहुल गांधी म्हणाले.

125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात बेरोजगारी ही प्रमुख समस्या आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकारने मागील साडेचार वर्षात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. देशातील जनता नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांमुळे त्रस्त झाली आहे. देशातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा हरितक्रांती आणण्याची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

'काँग्रेसमुक्त भारत व्हावा, अशी काही लोकांची इच्छा आहे. पण आम्ही भाजपमुक्त भारत व्हावा असं म्हणणार नाही. अम्हाला एकजुट भारत हवा आहे, जिथे प्रत्येक जण म्हणेल की आम्ही पहिलं भारतीय आहोत,' असे म्हणत राहुल गांधींनी नाव न घेता नरेंद्र मोदींना टोला लगावला.

राहुल गांधी आज अबूधाबीला जाणार असून तिथे ते संयुक्त अरब अमिरातच्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते इंडियन बिझनेस ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.