रेल्वे प्रवाशांना आता 20 मिनिटं आधी स्टेशनवर पोहोचावं लागणार
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2019 07:37 AM (IST)
लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना आता 20 मिनिटं आधीच स्टेशनवर पोहोचावं लागणार आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना आता 20 मिनिटं आधीच स्टेशनवर पोहोचावं लागणार आहे. कारण विमानतळासारखीच सुरक्षाव्यवस्था अंमलात आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. रेल्वे प्रवाशांना आता किमान 15-20 मिनिटं आधी स्टेशनला पोहोचून सुरक्षेचे सर्व टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. जर प्रवासी रेल्वे निघण्याआधी हे टप्पे पूर्ण करु शकला नाही, तर त्याला प्रवासाला मुकावं लागणार आहे. येत्या काही दिवसात ही योजना देशातील तब्बल 202 रेल्वे स्थानकांवर राबवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या स्थानकांवर ही योजना राबवली जाईल ती रेल्वे स्थानकं सर्वबाजूंनी सुरक्षित करण्यात येणार आहेत. सुरक्षेची जबाबदारी इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ज्याठिकाणी मार्ग बंद करण्याची सोय नसेल त्याठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सध्या देशभरातील 202 रेल्वे स्थानकांवर ही सुरक्षा योजना राबवण्यात येणार आहे. यात इंटिग्रेटेड सिक्यूरिटी सिस्टीम म्हणजेच ISS सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. ISS सुरक्षा यंत्रणेमध्ये CCTV कॅमेरे, बॅग स्कॅनिंग, बॉम्ब डिटेक्टर आदींचा समावेश असेल. ही यंत्रणा रेल्वे स्टेशनच्या सर्व प्रवेशद्वारांवर असेल. या सर्व योजनेसाठी 385 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.