लखनौ : हुबेहूब विमानतळासारखं दिसणाऱ्या उत्तर प्रदेशातील आलमबाग बस स्टँडचं उद्घाटन झालं आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या आधुनिक बस स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं. हिरवा झेंडा दाखवून इथून बस रवाना करण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील आणखी 21 बस स्टँड असेच आधुनिक करण्याचं जाहीर केलं.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात या बस स्टँडची निर्मिती सुरु झाली होती, जे काम योगी आदित्यनाथ यांनी पुढे चालू ठेवलं आणि त्याचं आज उद्धाटन करण्यात आलं.

विमानतळाचा लूक असणाऱ्या या बस स्टँडसाठी 235 कोटी रुपयांचा खर्च आला. यामध्ये सहा स्क्रीनचं थिएटर आहे. 125 रुमचं एक हॉटेलही मध्ये आहे, ज्याचे दर असे ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांनाही या सुविधेचा लाभ घेण्यात येईल.

या बस स्टँडमधून 700 बस चालवण्याची तयारी आहे. मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोठं फूड कोर्टही बनवण्यात आलं आहे. लवकरच हे बस स्टँड लखनौ मेट्रोला जोडलं जाणार आहे. यूपीतील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी शालीमार कॉर्पने या बस स्टँडची निर्मिती केली आहे.

समाजवादी पार्टीचे खासदार आणि कोषाध्यक्ष संजय सेठ या कंपनीचे मालक आहेत. समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कालच या बस स्टँडचं उद्घाटन केलं होतं.

आलमबाग बस स्टँडवर मिळणाऱ्या सुविधा

25 हजार प्रवाशांची क्षमता

तीन एकरात 50 प्लॅटफॉर्म

महिलांसाठी 50 पिंक बस चालणार

बस पकडण्यापूर्वी शॉपिंग करता येणार

प्रवाशांसाठी 200 कार पार्किंग करण्यासाठी जागा

एटीएम आणि वॉटर प्युरिफायर मशिन