नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील 'एम्स'ने मेडिकल बुलेटीन जारी करुन याबाबत माहिती दिली. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.


वाजपेयींना सध्या ताप नाही, किंवा रक्तदाबाचा त्रासही नाही. मूत्रसंसर्ग झाला असल्याचं रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटलं आहे. त्यांना उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल, असं बोललं जात आहे. मात्र यावर रुग्णालयाने काहीही सांगितलेलं नाही.

दरम्यान, वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयू मध्ये ठेवण्यात आलं आहे. कारण, केंद्रीय मंत्री अरुण जेटली सर्जरीनंतर अजूनही 'एम्स'मध्येच आहेत. रुग्णालयात एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे वाजपेयींना सीसीयूमध्येच ठेवण्यात आलं आहे.

भेटीसाठी दिग्गज 'एम्स'मध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

मोदी जवळपास 55 मिनिटे रुग्णालयात होते. त्यानंतर लगेच राजनाथ सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही रुग्णालयात येऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 2009 सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ते ग्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपच्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत.