Air India Flight : दुबईहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमान मुंबईकडे वळवण्यात आले असून मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लॅंड करण्यात आले आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीचे काम सोपविण्यात आले आहे. फ्लाइट क्रमांक AI-934 या विमानात बिघाड झाला आहे.
एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान दुबईहून कोचीला उड्डाण करत होते. या विमानात 258 प्रवासी होते. परंतु, अचानाक केबीनमधील हवेचा दाब कमी झाल्याची सूचना मिळाल्यानंतर वैमानिकाने ते मुंबईकडे वळवले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाडाच्या सूचनेनंतर हे मुंबईत सुरक्षितपणे लॅंड करण्यात आले.
या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे की, या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु आहे. विमानाच्या केबीनमध्ये पुरेसा प्रेशर नसताना विमानाचे उड्डाण करणे ही जोखिम पत्करण्यासारखे आहे. अचानकपणे विमानात असे काही घडले तर त्याबाबत तत्काळ माहिती देण्याबाबत वैमानिकाला प्रशिक्षण देण्यात आलेले असते.
दरम्यान, अलीकडील काही दिवसांमध्ये विमानात बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल म्हणजेच बुधवारीच दिल्लीहून गुवाहाटीला जाणारे गो फर्स्टचे विमान जयपूरला वळवण्यात आले होते. कारण वाऱ्याने विमानाचे विंडशील्ड तुटले होते.
मंगळवारी गो फर्स्टच्या मुंबई-लेह आणि श्रीनगर-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने उड्डाणे थांबवण्यात आली. 17 जुलै रोजी इंडिगोचे शारजाह-हैदराबाद फ्लाइट कराचीला वळवण्यात आले होते. कारण वैमानिकांना इंजिनमध्ये बिघाड आढळून आला होता.