नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमधील एअर स्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या वायूसेनेच्या पाच शूर वैमानिकांचा सन्मान केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी वायूसेनेचे सन्मानचिन्ह देऊन या वैमानिकांचा सन्मान केला जाणार आहे. 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधीळ जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्प्सवर या वैमानिकांनी बॉम्ब हल्ला केला होता.


विंग कमांडर अमित रंजन, स्क्वाड्रन लीडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बीकेएन रेड्डी आणि शशांक सिंह यांचा वायूसेनेकडून गौरव केला जाणार आहे. या सर्व वैमानिकांनी मिराज 2000 हे लढाऊ विमान घेऊन बालाकोटमध्ये चढाई केली होती.



विंग कमांडर अभिनंदन यांचा वीर चक्र


वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना देखील वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्यांचा वीर चक्राने सन्मान होणार आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.


अभिनंदन यांनी 27 फेब्रुवारी रोजी मिग-21 बायसन या विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग करुन, एक विमान पाडलं होतं. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना कैद केलं होतं. परंतु भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडावं लागलं होतं.