नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी माझाशी बातचीत केली. अनिल टिपणीस यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मुशर्रफ यांच्याशी अनेकवेळा संबंध आला होता. कारगील युद्ध त्यापैकी एक. टिपणीस यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या मुशर्रफ यांना सॅल्यूट केला नव्हता. हे प्रकरण त्यावेळी चांगलचं गाजलं होतं.
मुशर्रफ यांनी जेव्हा कारगिल युद्ध केलं, त्याचवेळी त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे होता. कारण, या युद्धात दोन्ही बाजूचे सैनिक आणि कित्येक नागरीकांचा नाहक बळी गेला. यात किती पाकिस्तानी लोक मारले गेले. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनाही क्रूर वागणूक देण्यात आली. मुशर्रफ यांना आज झालेली मृत्युदंडाची शिक्षा ही त्यांनी 2007 मध्ये संविधान बाजूला ठेवून जे काम केले त्याबद्दल देण्यात आली आहे. मात्र, त्यांना कारगिलबद्दल फाशी झाली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया भारतीय लष्कराचे माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी दिली आहे.


मुशर्रफ यांना सॅल्यूट का केला नव्हता?
आपले पंतप्रधान जेव्हा दिल्ली-लाहोर बस घेऊन तिकडे (पाकिस्तान)गेले होते. तेव्हा बॉर्डरवर तिथल्या लष्करप्रमुखांनी रिसीव्ह करायला नकार दिला होता. तो आपल्या पंतप्रधानांचा अनादर होता. पाकिस्तानी अधिकारी हे स्वतःच्या घमेंडीत असतात. दोनदा-तिनदा आपल्या सोबत लढाई हरुन देखीलही त्यांची घमेंड कमी झाली नाही. जेव्हा मुशर्रफ भारतात आले, तेव्हा त्यांचे ब्रिगेडियर कार्यक्रमाच्या आधी मला चुचकारण्याचा प्रयत्न करत होते. मी प्रोटोकॉल पाळतोय की नाही याबद्दल ते अस्वस्थ होते. त्यावेळी मी मुशर्रफ यांना सॅल्यूट केला नाही. आधीची काही पार्श्वभूमी लक्षात ठेवून उत्स्फूर्तपणे घेतलेला निर्णय होता.

मला त्यानंतर संरक्षण मंत्री किंवा इतर कोणी काही विचारलं नाही. वाजपेयी यांनी फक्त एकदा त्याबद्दल हटकलं होतं आणि नंतर उत्तरावर फक्त हसले होते. त्या हसण्याचा अर्थ मला उमगला नाही. मुशर्रफ हे मुजाहीर होते. त्यामुळे त्यांना आपल्या निष्ठा दाखवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले असावेत. पाकिस्तानमध्ये त्यांना आपलं मानलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांचा क्रूरपणा अधिक उफाळून आला असल्याचंही मतं टिपणीस यांनी नोंदवलं.

देशद्रोहाच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा
पाकिस्तानच्या 1973 संविधानानुसार इम्रान खान यांचं विद्यमान सरकार कामकाज करत आहे. हेच संविधान परवेज मुशर्रफ यांनी भंग केलं होतं आणि नवाज शरीफ यांचं सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती. पाकिस्तानच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरण आहे, ज्यात एखाद्या माजी लष्करप्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात नागरी कोर्टात खटला चालला. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

वाचा - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

Pervez Musharraf | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा | ABP Majha