AIMIM Chief, MP Asaduddin Owaisi on India Partition : नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांनी देशाच्या फाळणीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारताची फाळणी (India Partition) व्हायला नको होती, असं वक्तव्य करत ओवेसींनी देशाच्या फाळणीच्या घटनेला ऐतिहासिक चूक असल्याचं म्हटलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा देश दुर्दैवानं विभागला गेला, जे व्हायला नको होते, असंही एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख ओवेसी म्हणाले आहेत. 


खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या टिप्पणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानची स्थापना मोहम्मद अली जिना यांच्यामुळे नव्हे तर हिंदू महासभेच्या मागणीवरून झाली आहे.


देशाची फाळणी व्हायला नको होती : खासदार ओवेसी


खासदार ओवेसी बोलताना म्हणाले की, "ऐतिहासिकदृष्ट्या हा एकच देश होता आणि दुर्दैवानं त्याची फाळणी झाली. असं व्हायला नको होतं. मी इथे एवढंच सांगू शकतो, पण तुम्हाला हवं असल्यास यावर चर्चा करा. मी तुम्हाला सांगेन की, या देशाच्या फाळणीसाठी खरं जबाबदार कोण? त्यावेळी झालेल्या ऐतिहासिक चुकीवर मी फक्त एका ओळीत उत्तर देऊ शकत नाही." 


मौलाना कलाम यांची पुस्तकं वाचण्याचाही दिलाय सल्ला 


AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचं 'इंडिया विंस फ्रीडम' (India Wins Freedom) हे पुस्तक वाचण्याचाही सल्ला दिला आहे. तसेच, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी कसं काँग्रेस नेत्यांकडे जाऊन देशाच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारू नका, असं आवाहन कसं केलं ते सांगितलं. 


मौलाना आझाद यांनी काँग्रेस नेत्यांना केलं  होतं आवाहन : ओवेसी


ओवेसी म्हणाले, "या देशाची फाळणी व्हायला नको होती. फाळणीचा निर्णय चुकीचा होता. त्याला त्यावेळचे सर्व नेते जबाबदार होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांचं 'इंडिया विन्स फ्रीडम' हे पुस्तक वाचाल तर मौलाना आझाद यांनी सर्व काँग्रेसला विनंती केली होती. देशाचे विभाजन होऊ नये, तो प्रस्ताव अजिबात स्विकारु नका, असं आवाहन मौलाना आझाद यांनी सर्व नेत्यांना केलं होतं."