AI Voice Clone Fraud : ई-मेल स्पॅम, फिशिंग, पायरेसी, डेटा चोरी, हॅकिंग यासह अनेक माध्यमांद्वारे सायबर गुन्हेगार नागरिकांना लुटत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. याच्या लाखो कोट्यवधी तक्रारी पोलिस स्थानकात आहेत. सायबर गुन्हेगारीची वाढती संख्या पाहून देशभरात सायबर गुन्हेशाखा स्थापन करण्यात आल्या. पण सायबर गुन्हेगारी काही कमी झालेली दिसत नाही. सायबर गुन्हेगार प्रत्येकवेळी नवनवीन मार्ग शोधत आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी आणखी एक मार्ग शोधलाय. होय... सायबर गुन्हेगार सध्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत. एआय (artificial intelligence) चा वापर करुन व्हाईस क्लोनिंग केले जाते.. आई, वडील, गर्लफ्रेंड, बायफ्रेंड, मित्र अथवा नातेवाईक यांच्या आवाजात तुम्हाला पैसे मागण्यासाठी अनोळखी नंबरवरुन फोन आला तर यामधून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. McAfee च्या मे 2023 मध्ये जवळसात सात हजार जणांचा सर्वे केला होता. त्या सर्व्हेनुसार, जवळपास 83 टक्के लोक व्हाईस क्लोनिंगला बळी पडलेत. यामधील 47 टक्के लोकांनी 50 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम गमावली आहे. याव्यतिरिक्त, 69 टक्के भारतीयांना घोटाळ्यासाठी क्लोन केलेला AI आवाज आणि वास्तविक मानवी आवाज यातील फरक ओळखू शकतील असा विश्वास नाही. त्याशिवाय, जवळपास 47 टक्के भारतीय प्रौढांनी एआय व्हॉईस घोटाळ्यातील आवाज ओळखलाय. जगभरातील ही संख्या 25 टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये एआयचा वापर करुन फ्रॉड करण्याचे प्रमाण जास्त आहे.
सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी काय म्हणतात ?
कट, कॉपी आणि पेस्ट हे आता आपल्या आवाजाचेही होऊ शकते. म्हणजे आपल्या भाषण अथवा संभाषणातील आवाज एआय टूलच्या माध्यमातून वापरला जातो. आपला आवाज सॉफ्टवेअरमध्ये फिट केला जातो, त्यानंतर कॉम्पुटरवर शब्द टाईप केले जातात, एआय टूल आपल्या आवाजात बोलायला लागतो. Adobe सारख्या मोठ्या सॉप्टवेअर कंपनी आवाजाचा सॉफ्टवेअर तयार करतात. जर तुम्हाला कुणी पैशांची मागणी अथवा खंडणी मागण्यासाठी फोन आल्यास आवाजाची तपासणी करायला हवी, असे सायबर तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी सांगितले.
अमित वानखेडेंनी सांगितले AI द्वारे कसे केले जाते क्लोनिंग ?
एआयमध्ये दोन पर्याय आहेत. त्यामध्ये एका पर्यायात बोलताना लाईव्हमध्ये आपला चेहरा दिसतो, त्यासाठी अनेक टूल्स आहेत. त्यातच ओपन सोर्समध्ये रुट नावाचा एक पर्याय आहे. त्यामध्ये तुम्ही सिंगल फोटो अपलोड केल्यास सॉफ्टवेर तो व्हिडीओत दिसतो. वेबकॉमच्या जागी त्या सॉफ्टवेअरचा सोअर्स दिला जातो. त्यामुळे अनेकजण फसण्याची शक्यता आहे. व्हाईस क्लोन असा ही त्यामध्ये एक पर्याय आहे. पण यामध्ये तुम्हाला एखादा आवाज ट्रेन करावा लागतो. जवळपास अर्धा तासांचा आवाज त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून ट्रेन करावा लागतो. त्यामध्ये आरव्हीसी (real time voice cloning) हे एक मॉडेल मिळते.सॉफ्टवेअरमध्ये हे मॉडेल अपलोड केल्यास... समोर बोलताना कुणीही असो, ट्रेन केलेल्या व्यक्तीचाच आवाज तुम्हाला ऐकू येईल, असे अमित वानखेडे यांनी सांगितले.
माझ्या माहितीनुसार, अद्यापतरी कॉलिंगसाठी याचा वापर केल्याचे समोर आलेले नाही. माईकसमोर मोबाईल ठेवून बोलता येऊ शकतो. मोबाईलवरुन याचा वापर केल्याचे निदर्शनास आलेले नाही. कॅम्पुटरचा वापर करुनच व्हाईस क्लोनिंग केले जाऊ शकते. या सॉफ्टवेअरवरुन फक्त ऑनलाईन कॉलच होतो. झूम, फेसबूक, वेब व्हॉट्सअॅप, स्काईप यासारख्या माध्यमातून कॉल केला जाऊ शकतो. अर्थात, कॉलिंगसाठी पीसी वापरला जाऊ शकतो, तिथे व्हाईस क्लोनिंगचा वापर केला जाऊ शकतो, असेही वानखेडे यांनी सांगितले.
प्रत्येकाची बोलण्याची लकब वेगळी असते. त्यामुळे बोलताना लक्षपूर्वक ऐकल्यास आपल्याला क्लोनिंग केले की नाही, हे समजेल, असे अमित वानखेडे यांनी सांगितले.
रितेश भाटिया यांनी सांगितली काळजी काय घ्यावी -
गेल्या काही दिवसांत भारतात घटलेल्या एआय व्हाईस क्लोनिंग फसवणुकीच्या घटनेत एक निवृत्त झालेला व्यक्ती डीपफेक ऑडिओ घोटाळ्याला बळी पडल्याची घटना समोर आली. एआयद्वारे जवळच्या व्यक्तीचा आवाज काढून पैसे लुबाडले जात आहेत. कोणत्याही कृतीच्या कोणत्याही क्रियेतील व्यक्तीची ओळख पटवणे सहज शक्य होत नाही. अनोळखी क्रमांकावर जवळच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास सावधगिरी बाळगावी. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे स्वतंत्रपणे त्यांच्याशी संपर्क साधायला हवा. त्यामुळे पैसे पाठवण्याच्या आधी नक्की पैसे जवळच्या व्यक्तीनेच मगितलेत का? याची खात्री करा. त्याशिवाय या तंत्रज्ञानाबद्दल मोठ्या आवश्यकतेप्रमाणे वृद्ध व्यक्तींना शिक्षित करणे महत्वपूर्ण आहे. याचे धोके त्यांना समजावून सांगून काळजी घ्यायला सांगायला हवी, असे सायबर तज्ज्ञ अॅड. रितेश भाटिया यांनी सांगितले. एआय व्हाईस क्लोनिंग अथवा डीपफेक ऑडिओ आवाज ओळखण्यासाठी एआयचे काही टूल आहेत. त्याशिवाय डीपफेक ऑडिओ कॉल अथवा व्हिडीओ कॉल आल्यास त्याच्याशी वैयक्तिक गप्पा मारा... त्यामध्ये त्याला पर्सनल प्रश्न विचारा, जास्तीत जास्त प्रश्न किंवा माहिती विचारल्यास अनोळखी व्यक्तीचे (एआयद्वारे तुमच्या जवळचा व्यक्ती म्हणून फोन करणारा) भांडे फुटेल, असे भाटिया यांनी सांगितले.
सायबर पोलिस काय म्हणतात ?
महाराष्ट्रामध्ये सध्या एआय व्हाईस क्लोनिंग द्वारे फ्रॉड झाल्याच्या घटना अद्याप तरी समोर आलेल्या नाहीत. सोशल मीडियावर याबाबतच्या सध्या खूप चर्चा सुरु आहेत. भविष्यात कदाचीत अशा प्रकराच्या फ्रॉडचे प्रमाण वाढू शकते. नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. सध्या जॉब फ्रॉडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याशिवाय इतर कोणत्याही फ्रॉडला बळी पडू नये. सायबर फ्रॉडबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवहान डीसीपी सायबरचे रिडर दानवेश पाटील यांनी केले. मुंबईसह महाराष्ट्रात सायबर क्राईम होऊ नये, त्यासाठी आम्ही जनजागृती करत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
एआय व्हाईस क्लोनिंग धोकादायक का आहे ?
जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट असा वेगळा आहे. फिंगरप्रिंट जसा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात तसा प्रत्येक व्यक्तींचा आवाज वेगळा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने बोलल्यास त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. भारतातील प्रौढ असलेले 86 टक्के लोक आठवड्यातून एकदातरी सोशल मीडियावर आपला आवाजाचा व्हिडीओ अथवा ऑडिओ टाकतात. प्रेयसी, प्रियकर अथवा आई-वडील किंवा मित्रांना रिप्लाय देताना आपण व्हाईस नोट पाठवतोच. याचाच वापर करुन सायबर गुन्हेगार एआयच्या मदतीने तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आवाजात फोन करतात. त्यामुळे व्हाईस क्लोनिंग सायबर गुन्हेगारांसाठी मोठं शस्त्र झालेय.
एआय टूलचा वापर करुन तुम्हाला फोन केला जातो. जवळच्या अथवा ओळखीच्या व्यक्तीचा फोन आल्यामुळे डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. एआयच्या एआयच्या मदतीने आता आवाज कॉपी करणं सोपे झालेय. उदाहरण घ्यायचे झाले तर... एआयच्या मदतीने अरजीत सिंह याचे कोणतेही गाणं आतिफ अस्लम याच्या आवाजात ऐकू शकतो. एआय टूलचा वापर करुन मित्र अथवा नातेवाईकाच्या आवाजात फोन करुन फसवणूक केली जाते.
अशावेळी काय कराल ?
तुमच्या ओळखीच्या आवाजात फोन आला तर डोळे झाकून विश्वास बसतो. तुम्हाला समजा अनोळखी क्रमांकावरुन फोन आला आणि पैसे अथवा कार्ड्सच्या डिटेल्स मागितले तर देऊ नका. तुम्ही ज्यांच्या आवाजात फोन आलाय त्या व्यक्तीच्या क्रमांकावर फोन करुन पैसे मागितलेत का याची खात्री करा... 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक याला बळी पडले आहेत, कारण कुटुंबातील सदस्य म्हणून फोन येतो अन् बँक खाते रिकामे होते. त्यामुळे पैसे मागण्यासाठी अनोळखी क्रमांकावरुन फोन आला तर सावध व्हा... तुम्हाला वारंवार असा अनुभव आला तर पलिसांमध्ये तक्रार द्या. तुम्हाला ज्या क्रमांकावरुन फोन आला तो क्रमांक पोलिसांना द्या.
एआयमधील डीपफेक या टूलचा वापर करुन व्हिडीओ कॉलही येऊ शकतो. तुमच्या ओळखीचा व्यक्ती तुम्हाला समोर दिसेल, त्यामुळे काही सेकंद तुम्ही बुचकळ्यात पडाल अन् पैसे पाठवाल. पण तुम्हाला ज्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आलाय, त्याला स्वत:च्या फोनवरुन कॉल करायला सांगा अथवा तुम्ही फोन करुन खात्री करा. अनोळखी क्रमांकावरुन व्हिडीओ कॉल आल्यास सावधच राहा. त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ बोलल्यास तुम्हाला लगेच फ्रॉड असल्याचे समजेल.