अहमदाबाद विमान दुर्घटना (Ahmedabad plane crash) 250 पेक्षा जास्त नागरिक आणि एअर इंडियाच्या (Air india) विमानातील 241 प्रवाशांसाठी काळ बनून ठरली. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानातून 169 भारतीय नागरीक, 53 ब्रिटीश नागरिकांसह एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता उड्डाण केलेलं हे विमान अवघ्या काही मिनिटांतच विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात कोसळलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. त्यामध्ये, शेकडो प्रवाशांचा जळून कोळसा झाला. सुदैवाने एक प्रवासी बाहेर फेकला गेल्याने बचावला असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. कुणी आपलं अख्ख कुटुंब गमावलंय, कुणी आई-वडिल गमावलेत, तर कुणी आपली लेकरं गमावली आहेत. नातेवाईकांचा रुग्णालयातील (Hospital) आक्रोश डोळ्यात पाणी आणणारा आहे.
लंडनला ॲमेझॉन कंपनीमध्ये काम करणारा मुलगा आणि सुनेचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलगा हर्षितते फ्लाईटमध्ये बसल्नंतर वडिलांना शेवटचा फोन कॉल केला होता, पण या कॉलनंतर काही वेळातच अपघाताची घटना घडली. त्यामुळे, अहमदाबाद अपघातात आपला लेक आणि सून गमावलेल्या हर्षतच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे 2 वर्षानंतर लेक, सुनेसोबत मायदेशी आई-वडिलांकडे आला होता. गावाकडेची सुट्टी एन्जॉय करुन ते पुन्हा लंडनला अहमदाबाद-लंडन बोईंग विमानाने निघाला. मात्र, गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेत हर्षत आणि त्याची पत्नी पूजा या दोघांचा मृत्यू झाला.
2 वर्षानंतर मायदेशी परतला होता हर्षित
गुजरातच्या नडियाद जिल्ह्यातील अनिल पटेल यांचा मुलगा हर्षित पटेल आणि सून पूजा पटेल हे गेल्या दोन वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. मुलगा ॲमेझॉनमध्ये नोकरी करत होता, दरम्यान 2 वर्षानंतर आपल्या गावी आल्यानंतर हे दाम्पत्य विमानाने पुन्हा लंडनला निघाले होते. विशेष म्हणजे वडिलांनी निरोप देताना लेकाला आणि सुनेला फोन केला. मात्र, हा निरोपाचा हा फोन कॉल शेवटचा निरोप ठरला. कारण, विमानात बसल्यानंतर 1 वाजेच्या सुमारास हर्षतने वडिलांना फोन करुन फ्लाईटमध्ये बसल्याचा कॉलही केला होता. मात्र, त्यानंतर विमानाचा अपघात झाल्याचे समजलं आणि पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षतचे वडील अनिल पटेल आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पहाटेपासून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत, आपलं डीएनए सॅम्पलही त्यांनी रुग्णालयात दिलं आहे. मात्र, एकापेक्षा एक भयंकर आणि मन हेलावणाऱ्या नातेवाईकांच्या कथा ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावत आहेत.
हेही वाचा
मुलीला सरप्राईज अन् लेकाच्या पदवीदान सोहळ्याला निघालेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू