Air India Plane Crash: एअर इंडियाच्या अहमदाबादवरुन इंग्लंडला निघालेल्या बोईंग ड्रीमलायनर या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला होता. एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हे विमान जवळच्या मेघानी नगरमध्ये कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता आणि आग लागली होती. त्यामुळे विमानातील प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. या मृतदेहांचा कोळसा झाल्यामुळे प्रवाशांची ओळख पटवणे अवघड होऊन बसले आहे.
त्यामुळे आता प्रवाशांच्या मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन त्यांची ओळख पटवली जाणार आहे. अहमदाबाद येथील कसोटी भवनमध्ये मृतदेहांच्या डीएनए टेस्ट सुरु आहेत. त्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना कसोटी भवन येथे बोलावण्यात आले आहे. या अपघातात विमानातील 241 जण आणि मेघानी नगरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसमधील 24 डॉक्टरांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने मृतदेह असल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातील. सध्या कसोटी भवन येथे डीएनए सॅम्पलिंग प्रक्रिया सुरु आहे.
आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आल्या आहेत . डी एन ए टेस्ट आणि डीएनए मॅच साठी 72 तास लागणार आहेत. काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्याने अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणे बाकी आहेत. डी एन ए मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवले जातील.
Air India Plane Crash: पुणे-अहमदाबाद विमानांना उशीर
अहमदाबाद लंडन विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. एका विमानाच्या उड्डाणाला पाच तास उशीर झाला.तर, दुसऱ्या विमानाला एक तास उशीर झाला. इंडिगो कंपनीचे विमान दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते.मात्र, अपघाताच्या घटनेमुळे या विमानाला उशीर झाला. हे विमान रात्री नऊ वाजता पाच तास उशिराने उड्डाण केले. तर,अक्सा एअर कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ते विमान रात्री पावणे सात वाजता सुटले. त्यामध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.
आणखी वाचा
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; नेमकं काय घडलं?, A टू Z समजणार!