अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या जीप आणि ट्रकच्या अपघातात डोंबिवलीत राहणाऱ्या शहा कुटुंबातील 11 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात फक्त एकच तरुण बचावला. भावनगरमध्ये देवदर्शनाला जाताना हा भीषण अपघात झाला.

अहमदाबादमधल्या धंधुका बरवाला रस्त्यावर हा अपघात घडला. तूफान जीपने शहा कुटुंबीय पालिताना मंदिरात देवदर्शनाला चालले होते. यावेळी ट्रकच्या धडकेत जीपमधील 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहा कुटुंबातील पाच महिलांचा समावेश आहे.

डोंबिवलीच्या कस्तुरी प्लाझाजवळील निशीगंधा इमारतीत शहा कुटुंबीय राहत होते. त्यापूर्वीही ते याच भागातील दुसऱ्या इमारतीत अनेक वर्षांपासून वास्तव्याला होते. शनिवारी संध्याकाळी ते देवदर्शनासाठी गुजरातला निघाले होते. मात्र रात्री त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्यात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला.



या घटनेमुळे डोंबिवलीच्या टाटा पॉवर लाईन भागात शोककळा पसरली आहे. अपघातात शशिकांत शहा यांच्यासह पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, तर जैनम शहा हा 17 वर्षांचा मुलगा सुदैवानं बचावला आहे.

मृतांची नावे :

1. शशिकांत वि. शहा (56)
2. रीटा शशिकांत शहा (46)
3. धरा शशिकांत शहा (25)
4. किरण कमलेश शहा
5. जिनाली कमलेश शहा (20)
6. नेमील कमलेश शहा (17)
7. हितेश त.शहा (52)
8. विभा शहा (48)
9. नंदीप शहा (22)
10. जैशुबेन दिनेश शहा (वडोदरा)
11. भारतीबेन किशोर शहा (सुरत)

गंभीर जखमी :

जैनम शशिकांत शहा (17)