नवी दिल्ली : ताजमहालाची निर्मिती बादशहा शाह जहाननं त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी केली होती. आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागानं लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे.


2015 मध्ये सहा वकिलांनी आग्रा कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ज्या याचिकेत ताजमहाल हे पूर्वी शंकराचे मंदिर होते. त्यामुळे इथं आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  केली होती.

विशेष म्हणजे, ताजमहालात काही खोल्या बंद आहेत, त्या उघडण्यात याव्या अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यावर कोर्टाने केंद्र सरकार आणि संस्कृतिक मंत्रालयासह गृह विभाग आणि पुरातत्व खात्याला नोटीस देऊन, उत्तर मागितलं होतं.

यावर पुरातत्व खात्यानं आग्रा येथे असलेला ताजमहाल म्हणजे तेजो महाल किंवा शंकराचे मंदिर नाही, असा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागानं लेखी स्वरूपात कोर्टात सादर केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. ताजमहाल या वास्तूला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे.