Ahmed Patel passes away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरवरून माहिती
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'वडील अहमद पटेल यांचं आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान एकाच वेळी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं, त्यांनंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचं पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.'
एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेला : दिग्विजय सिंह
अहमद पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट केलं आहे की, "अहमद पटेल आपल्यातून निघून गेले. एक अभिन्न मित्र विश्वसनीय साथी निघून गेलाय. आम्ही दोघंही 1977 पासून एकत्र होतो. ते लोकसभेत पोहोचले. मी विधानसभेत. आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते प्रत्येक राजकीय आजाराचं औषध होते. मृदुभाषी, व्यवहार कुशल आणि सदैव हसतमुख राहणं हिच त्यांची ओळख होती.