Cyclone Nivar : बंगालच्या उपसागरात नैऋत्येला निर्माण झालेलं 'निवार' चक्रीवादळ वेगाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारी हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या कराईकाल आणि महाबलीपुरम दरम्यानच्या किनाऱ्यावर आदळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापूर्वीच किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागांतील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हा पाऊस अत्यंत मुसळधार कोसळू शकतो. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, 'चेम्बरमबक्कम तलावासह अनेक तलावांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे. तसेच तलावाजवळ राहणाऱ्या लोकांनाही खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.'


बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागांत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर भागांच्या दिशेने गेला आणि त्याचं रुपांतर 'निवार' चक्रीवादळात झालं. हे चक्रीवादळ पुद्दुचेरीपासून 410 किलोमीटर दूर आहे.





पुढील 24 तासांत या चक्रीवादळाचं रुद्रावरतार पाहायला मिळणार आहे. पुढिल 12 तासांत हे वादळ पश्चिम-उत्तरेच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर उत्तर-पश्चिमच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे.


निवार चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाचे 1200 जवान तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच आणखी 800 जवानांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 12 रेल्वे गाड्याही रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वादळच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील काही रेल्वे गाड्या आधीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे चक्रीवादळ जवळपास 130 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. वादळापूर्वी मुसळधार पावसाने या भागांत हजेरी लावली आहे. निवार चक्रीवादळ पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधून जाणार आहे. निवार चक्रीवादळ तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर 120-130 किलोमीटर ताशी वेगाने धडकणार आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.