नवी दिल्ली : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी बहुचर्चित ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. सोमय्या यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थात 'ईडी'ला पत्र लिहून राहुल गांधींच्या चौकशीची मागणी केली आहे.

 

इतकंच नाही तर ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा आणि दिल्लीतील कॉमनवेल्थ घोटाळा यांच्यात समान दुवा असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.



सोमय्यांचं ईडीला पत्र

 

सोमय्यांनी ईडीला पत्र लिहून राहुल गांधी आणि EMMAR MGF कंपनीचे कनिष्क सिंह यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

 

ऑगस्टा हेलिकॉप्टर करारादरम्यान झालेल्या दलालीतील आरोपी मिशेल हेशके, रियल इस्टेट कंपनी EMMAR MGF आणि कनिष्क सिंह यांच्या संबंधांची चौकशी आवश्यक आहे.

 

मिशेल हेशके कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणात दोषी आढळला होता. सोमय्या यांच्या मते, EMMAR MGF कंपनीला उभी करण्यात कनिष्क परिवाराने मदत केली होती. कनिष्क सिंह हे राहुल गांधी यांचे सल्लागार आणि मुख्य सचिव आहेत.

 

कनिष्क सिंह यांची प्रतिक्रिया

 

दरम्यान कनिष्क सिंह यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सोमय्यांनी राजकीय हेतून हे आरोप केल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.

 

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?

भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदीचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.

 

या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.

 

या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.

 

इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.

 

संबंधित बातम्या

काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?

मोदीजी, हिंमत असेल तर सोनियांना अटक करा : केजरीवाल

हेलिकॉप्टर घोटाळा : माजी वायुदल प्रमुख त्यागींवर गुन्हा

हेलिकॉप्टर लाचखोरी : दलाल गिडो हॅस्कीला अटक