Dragon Fruit : केंद्र सरकारने ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत (MIDH) भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या भारतात तीन हजार हेक्‍टरवर या ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. येत्या पाच वर्षांत ही लागवड 50 हजार हेक्‍टरपर्यंत वाढवण्‍याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 
ड्रॅगन फ्रूट एक वनौषधी फळ म्हणूनही ओळखले जाते. आरोग्याच्या दृष्टीने हे फळ चांगले आहे. ड्रॅगन फ्रूटची दक्षिण मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, यूएसए, कॅरिबियन बेटे, ऑस्ट्रेलियामध्येही संपूर्ण उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय भागात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ही वनस्पती मूळची दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. आज जगभरात याची लागवड केली जाते. त्यानंतर आशियाई देशांमध्येही ड्रॅगन फ्रूटचा विस्तार झाला. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूट या फळाचं नाव बदलले आहे. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणे असल्यामुळे याचं नाव 'कमलम' केलं आहे. ड्रॅगन फ्रूट ही वनस्पती 20 वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पादन टिकवून ठेवते. पौष्टिक गुणधर्म जास्त असतात. तसेच मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांसाठी हे फळ चांगले आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.


देशातील 'या' राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढली


भारताततही ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र वाढत आहे. देशातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे मिझोराम आणि नागालँड या राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या भारतात ड्रॅगन फ्रूटचे एकूण लागवडीखालील क्षेत्र तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. जे देशांतर्गत मागणी पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे हे क्षेत्र 50 हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ड्रॅगन फळांपैकी बहुतेक थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका येथून आयात केली जातात.


दरवर्षी भारतात ड्रॅगन फ्रूटची मोठ्या प्रमाणात आयात


केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2017 मध्ये ड्रॅगन फ्रूटची आयात 327 टन झाली होती. तर 2019 मध्ये ही आयात 9 हजार 162 टन इतकी झपाट्याने वाढली. 2020 आणि 2021 साठी अंदाजे आयात अनुक्रमे 11 हजार 916 आणि 15 हजार 491 टन झाली होती. दरवर्षी ड्रॅगन फ्रूटच्या आयातीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने ड्रॅगन फ्रूट लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर 3 ते 4 वर्षात पूर्ण उत्पादन मिळायला सुरुवात होते. या पिकाचे पिकाचे आयुर्मान सुमारे 20 वर्षे असते. लागवडीनंतर 2 वर्षांनी सरासरी आर्थिक उत्पन्न 10 टन प्रति एकर होते. सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला 100 रुपये प्रति किलोचा दर आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.


महत्त्वाच्या बातम्या:


सकारात्मक... नांदेडमधील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानं फुलवला 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, पारंपरिक शेतीला फाटा देत यशस्वी प्रयोग