पाटणा : योग हे सर्व समस्यांचं समाधान आहे, असं योगगुरु सांगतात. कदाचित देशाच्या कृषीमंत्र्याचा त्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शेतकरी रस्त्यावर उतरला असताना देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह योगा करण्यात मग्न आहेत.
त्यांच्या योगा करण्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ते चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. बिहारच्या मोतीहारी इथं ते योग शिबिरात गेले होते.
गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. मध्य प्रदेशात गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मात्र देशाच्या कृषीमंत्र्यांचं मौन कायम आहे.
मध्य प्रदेशातील घटना दुर्दैवी आहे. यावर राजकारण करणाऱ्यांना शेतकऱ्यांची आणि देशाची काहीही काळजी नाही, असं राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. शहरात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे.