भोपाळ : मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या 29 नेत्यांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर सर्वांना तातडीने जामीनही मंजूर करण्यात आला.


जिल्ह्यात कर्फ्यू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधींसह इतर नेते राजस्थानच्या सीमेकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती नीमच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज सिंह यांनी दिली.

राहुल गांधींना अटक का केली?

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेल्या राहुल गांधींना राजस्थान सीमेवर अडवण्यात आलं. मात्र पोलिसांना गुंगारा देत राहुल गांधी तिथल्या एका दुचाकीवरुन निघून गेले. राहुल गांधी निम्बाडाजवळ दुचाकीवर स्वार होऊन मंदसौरच्या दिशेने रवाना झाले.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं मंदसौरमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज सकाळी राजस्थानमार्गे मध्य प्रदेशात पोहोचले. मात्र पोलिस अधीक्षकांनी राहुल गांधींना तणावग्रस्त मंदसौर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली. कारण कर्फ्यू असल्यामुळे मंदसौरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली होती.