लखनौ: उत्तरप्रदेशमधील आग्रामध्ये बोहल्यावर चढलेल्या एका नवरदेवाला नवऱ्या मुलीनं थेट जेलमध्येच धाडल्याची घटना घडली आहे. बीएसएफमध्ये जवान असणारा नवरदेव भर मंडपात हुंड्यासाठी अडून बसला होता. नवऱ्या मुलीला ही गोष्ट समजताच तिनं एक धाडसी आणि मोठं पाऊल उचललं ज्यानं नवरदेवाचेही डोळे खाड्कन उघडले.

भर मंडपात शोभा नको म्हणून मुलीकडील मंडळी मुलाचे पायही पकडायला तयार झाले होते. पण नवरदेव आपला हेका काही सोडायला तयार नव्हता. दोन लाख रुपये हुंडा द्या असा हट्ट नवऱ्या मुलांनं लावून धरला होता. त्यानंतर नवरी मुलीनं त्याला असा धडा शिकवला की त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यातच झाली.



ग्वालियरला राहणाऱ्या दीप्तीच्या मते, तिचं लग्न बीएसएफ जवान दीपकसोबत ठरलं होतं. लग्नाची संपूर्ण तयारीही झाली होती. पण, ऐन मुहूर्ताच्या वेळी दीपकनं 2 लाख रुपयांची मागणी केली. जर आपल्याला 2 लाख मिळाले नाही तर आपण लग्न करणार नाही. असं त्यानं सर्वांसमोर सांगितलं. आपण दीपकचं हे सार वागणं बराच वेळ पाहत होतो. माझ्या घरचे दीपकच्या पायावर अक्षरश: लोळण घेत होते आणि तो त्यांचा अपमान करत होता. पण दोन लाख दिल्याशिवाय आपण लग्न करणार नाही असं त्यानं स्पष्ट सांगितलं.

या सर्व प्रकारानं वैतागलेल्या दीप्तीनं अखेर पोलिसात धाव घेतली. दीप्तीच्या सांगण्यावरुन तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना थेट पोलिसा ठाण्यात जावं लागलं. हुंड्यासाठी लालची असणाऱ्या नवऱ्या मुलाविरोधात दीप्तीनं जी हिंमत दाखवली त्याबद्दल तिचं सगळ्यांकडूनच कौतुक करण्यात येत आहे.