Agnipath scheme :  लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. देशभरातील युवक रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत आहेत. यामध्ये काँग्रेस देखील सहभागी झाली आहे. काँग्रेसनंही या योजनेला मोठा विरोध केला आहे. दरम्यान, आता काँग्रेसनं या योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून काँग्रेस देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस रणनिती करत असल्याची चर्चा सुरु आहे.


दरम्यान, उद्या (27 जून) देशभरातील प्रत्येक विधानसभेत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन अग्निपथ योजनेला विरोध करणार आहेत. आज लखनौमध्ये पक्षाचे बडे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच देशातील 20 शहरांमध्ये देखील हे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये अजय माकन, डेहराडूनमध्ये मानवेंद्र सिंह, जयपूरमध्ये दीपेंद्र हुडा, चेन्नईमध्ये गौरव गोगोई, पटनामध्ये कन्हैया कुमार, शिमल्यात आलोक शर्मा आणि इतर अनेक नेते सामील होणार आहेत.


केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल : राहुल गांधी


राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीच्या मुद्द्यावरुन, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत निदर्शने केली. राजकीय सुडापोटी ही कारवाई सुरु असल्याचे सांगत काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. अग्निपथ योजना ही तरुणांविरुद्ध असून, देश आणि लष्कराविरुद्ध हा धोका असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारला ही योजना मागे घ्यावीच लागेल असेही त्यांनी सांगितलं.


भारत सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. खास करुन उत्तर भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि आसाममध्ये तरुणांनी या योजनेला विरोध केला आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरुन त्याविरोधात घोषणाबाजी आणि जाळपोळ केली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत.