Agneepath Recruitment Scheme : सैन्य दलात (Army Recruitment) भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना 'अग्नवीर' असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. 'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. सैन्य भरतीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला लष्करी व्यवहार विभागाकडून नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित केली जाईल. सैन्यातील ही नवीन भरती योजनेचं नाव 'अग्निपथ' आहे.


चार वर्षानंतर होणार निवृत्ती 
नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती आहे. 


जगभरासह देशात मागील दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे अनेक सरकारी विभागातील भरती थांबल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून सैन्यभरती देखील झालेली नाही. दरम्यान, संरक्षणराज्य मंत्री अजय भट्ट यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच संसदेत एका लेखी प्रश्नला उत्तर देताना कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही, अशी माहिती दिली होती. याबरोबरच सैन्यभरतीसह हवाई दल आणि नौदलांची भरती देखील थांबवण्यात आली आहे. परंतु, दोन वर्षांपासून सैन्य भरती थांबवण्यात आल्यामुळे भरतीची तयारी तरणाऱ्या तरूणांमध्ये संताप असून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आपला विरोध व्यक्त केला होता. याबरोबरच सोशल मीडियावर देखील  थांबवण्यात आलेली सैन्य भरती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तरूणांमधून करण्यात येत आहे.


कोणत्याही रेजिमेंटसाठी करता येणार अर्ज 
विशेष म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही. तर ही भरती भारतीय म्हणून होईल. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती होण्याची शक्यता आहे.