श्रीनगर : 2001 मध्ये संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी फाशी झालेल्या अफझल गुरुच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मिर बोर्डाच्या परीक्षेत गालिब अफझल गुरुने 88 टक्के गुण मिळवले आहेत.


गालिबला 500 पैकी 441 गुण मिळाले आहेत. पर्यावरण विज्ञान विषयात 94, रसायनशास्त्रात 89, भौतिकशास्त्रात 85, जीवशास्त्रात 86 तर इंग्रजी विषयात त्याला 89 गुण मिळाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा त्याने 2016 मध्ये व्यक्त केली होती.

'मेडिकलचं शिक्षण घेऊन मी डॉक्टर व्हावं, असं माझे पालक आणि कुटुंबीयांचं स्वप्न आहे. मी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन' असं गालिब म्हणाला होता. दहावीच्या परीक्षेतही गालिबला 95 टक्के गुण मिळाले होते. गुरुवारी सकाळी जम्मू आणि काश्मीर राज्य शालेय शिक्षण बोर्डाचे निकाल जाहीर झाले.

अफझल गुरुनेही वैद्यकीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती, मात्र अभ्यासक्रम त्याने अर्ध्यावरच सोडून दिला. अफझल गुरुला अटक झाली, त्यावेळी त्याचा मुलगा गालिब अवघ्या दोन वर्षांचा होता. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात दोषी आढळल्याने 2013 मध्ये त्याला फाशी झाली होती.