नवी दिल्ली : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.


यूजीसीची भूमिका पहिल्यापासून परीक्षेचीच होती. जर तेव्हाच हे ऐकलं असतं तर विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला नसता. परीक्षा न घेता पदवी हे शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही. परीक्षा होणारच हे आता स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या देखील आहेत. 30 सप्टेंबरनंतरही परीक्षा होऊ शकतात. राज्य सरकार त्यांचे प्रस्ताव घेऊन येतील त्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालात जे निर्देश असतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.

UGC Exams Final Verdict: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

परीक्षा घेण्यासाठी युजीसीकडून स्वातंत्र्य
वेगवेगळी विद्यापीठं आपापल्या अखत्यारीत परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय घेऊ शकतात. युजीसीने त्यांना स्वातंत्र्य दिलं आहेच. आमच्या गाईडलाईन्स ब्रॉड आहेत. एकदा परीक्षा घ्या असं सांगितल्यानंतर त्या कशा घ्यायच्या याचे अधिकार विद्यापीठांना आहेत. वेळेत अंमलबजावणी न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचेही डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले. हे प्रकरण कोर्टात जायची गरजच नव्हती. सामोपचाराने त्याच वेळी मिटवता आलं असतं. विद्यार्थ्यांना काही मार्कलिस्ट दिल्या गेल्या यावर कोरोनाचा उल्लेख होता, असे प्रकार चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारांना लागेल ती मदत आम्ही नक्की करू
राज्य सरकारांना लागेल ती मदत आम्ही नक्की करू, असे आश्वासन युजीसीने दिलं आहे. दोघांनी मिळूनच हे करावं लागणार आहे. जगातल्या इतर मॉडेलचा देखील आम्ही अभ्यास केला होता. जगात कुठल्याही प्रथितयश नामांकित विद्यापीठानं संस्थेने परीक्षेशिवाय पदवी द्या, असं म्हटलं नाही किंवा केलं नाही. गोंधळाची परिस्थिती संपली याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार देखील युजीसीने मानले. या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला असेलच. नवीन शैक्षणिक वर्ष कसं सुरू करायचं याबाबत महाराष्ट्र सरकारची सूचना चांगली आहे. त्याबाबत आम्ही जरूर विचार करू. आपले विद्यार्थी समंजस आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करून त्यांनी अभ्यास चांगला केला असेल आधीपेक्षा ते चांगले गुण मिळवतील, असा विश्वास डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला.

UGC Exams Final Verdict अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच : सुप्रीम कोर्ट