नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सत्तेचा देशभरात विस्तार करत असले तरी एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. शिवसेना, टीडीपी, भारतीय समाज पार्टी यांच्यानंतर या यादीत आता पंजाबमधील अकाली दलचाही समावेश झाला आहे. हे सर्व भाजपवर नाराज असलेले एनडीएतील मित्रपक्ष आहेत.


पंजाबमधील मोठा पक्षही आता भाजपवर नाराज असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या अडचणी वाढणार आहेत. 2012 साली अकाली दलने भाजपसोबत मिळून बहुमताने सत्ता मिळवली होती. अकाली दलचे लोकसभेत चार खासदार आहेत.

''अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते मित्रपक्षांना सोबत घेऊन चालत होते. मात्र मोदी मित्रपक्षांना महत्त्व देत नाहीत,'' असा आरोप अकाली दलचे खासदार सुखदेव ढींढसा यांनी केला आहे. सुखदेव ढींढसा हे केवळ खासदारच नाही, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये क्रीडा आणि रसायनमंत्री होते.

पक्षाच्या हरसिमरत कौर मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही अकाली दलने मोदी सरकारवर हा आरोप केला आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. त्यापैकी सध्या चार जागांवर अकाली दलचे खासदार आहेत. तर एका जागेवर भाजपचा विजय झाला होता.

पंजाबमधील मोठा चेहरा असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवाय आता अकाली दलनेही भाजपविरोधातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. हीच परिस्थिती राहिली तर मोदींसाठी 2019 च्या निवडणुकीत अडचणी निर्मात होतील हे नक्की आहे.