नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि विरोधकांकडून मोठमोठ्या सभांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये यापुढे मोठी सभा करणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जास्तीत जास्त 500 नागरिकांच्या उपस्थितीतच भाजपच्या सभा त्याही खुल्या मैदानातच होणार आहेत. भाजप आजपासून अपना बूथ-कोरोनामुक्त अभियान सुरु करणार आहे. तसंच भाजप राज्यातील नागरिकांना सहा कोटी मास्कसह सॅनिटायझारचाही वाटप करणार आहे.


कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारसभा सुरुच होत्या. यावरुन भाजपवर टीका केली जात होती. यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठ्या सभा न घेण्याचा निर्णय घेतला. भाजप आता कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन छोट्या सभा घेणार आहे. या निर्णयानुसार भाजप आता खुल्या मैदानात सभा घेणार असून तिथे केवळ 500 लोकच उपस्थित राहू शकतात.


सर्वात आधी राहुल गांधींचा सभा न घेण्याचा निर्णय 
पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत सर्वात आधीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा न घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांनी म्हटलं की, या सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार करायला हवा. तर पक्ष आता कोणतीही मोठी सभा घेणार नाही, अशी अधिकृत भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी जाहीर केली.


ममता बॅनर्जी यांचाही मोठ्या सभांपासून दूर राहण्याचा निर्णय
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली. ममता बॅनर्जी यांनी आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करणार नाहीत. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आता कोलकातामध्ये छोट्या सभांचंच आयोजन करणार आहे.