नवी दिल्ली : अमूल डेअरीने दुथाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एक लीटर दुधासाठी 2 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. दुधाची वाढलेली किंमत महाराष्ट्र दिल्लीसह इतर राज्यांमध्ये 21 मे पासून लागू होणार आहे. तर गुजरातमध्ये 4 जूननंतर वाढीव दर लागू होतील. रविवारी (काल) लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांमधील मतदान संपुष्टात आले. मतदानाची प्रक्रिया संपताच देशभरात अमूलच्या दुधाच्या किंमतीत वाढ केली जाणार असल्यामुळे सरकारवर टीका सुरु झाली आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी याबाबत म्हणाले की, दिल्ली-एनसीआर, गुजरात, पश्चिम बंगाल, कोलकाता, उत्तरांचल, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये उद्यापासून दुधाची वाढलेली किंमत लागू होणार आहे. दिल्लीमध्ये आम्ही 2014 मध्ये दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादनाच्या खर्चात 20 टक्के वाढ झाली असल्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ करावी लागत आहे. अमूलचे अमूल ताजा (टोंड मिल्क ) हे दूध 42 रुपये प्रति लीटर तर अमूल गोल्ड (फुल क्रीम मिल्क ) 52 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. मंगळवारपासून अमूल ताजा 44 रुपये प्रति लीटर तर अमूल गोल्ड 54 रुपये प्रति लीटर दराने मिळेल.