नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या आधी आलेल्या बहुतांश एक्झिक्ट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली आहे.  हे एक्झिक्ट पोल आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीए सर्व पक्षांच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित केले आहे.


या डिनर पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत आगामी रणनीती ठरविली जाणार असल्याची देखील माहिती आहे.

उद्या 21 मे रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची ही बैठक बोलावली आहे. अमित शाह घटक पक्षाच्या नेत्यांसाठी रात्री भोजनाचे आयोजन करणार असल्याची माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली. अमित शाह यांच्याकडून डिनरसाठी हे आमंत्रण केवळ औचित्य आहे.

निकालानंतरच्या आगामी धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशभरात लोकसभा निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये पूर्ण झाली आहे. मतमोजणी आणि निकाल 23 मे रोजी घोषित होणार आहेत.

मतदानानंतर सर्व वाहिन्यांचे (चॅनेल) आणि एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येदेखील देशामध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एनडीए सरकार स्थापन करेल असे सर्व पोल्समध्ये दिसत असले तरी अर्ध्याहून अधिक एक्झिट पोल्समध्ये 2014 च्या लोकसभेप्रमाणे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे समोर आले आहे. सर्व पोल्सची सरासरी काढली तर स्पष्ट होते की,  एनडीए बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करेल. सर्व वाहिन्या आणि एजन्सींच्या एक्झिट पोल्सची सरासरी काढली तर एनडीएला 291 युपीएला 125 आणि इतर पक्षांना 124 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

भाजपसोबत एनडीएमध्ये असलेले पक्ष
भाजपसोबत एनडीएमध्ये 40 लहान-मोठे पक्ष आहेत. यामधील 9 पक्षांचा मोठा प्रभाव आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. यानंतर जदयू, अण्णा द्रमुक,  एआईएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यांसह 40 पक्ष एनडीएमध्ये आहेत.