भोपाळ : मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे अनिश्चित काळासाठी उपोषण करणार आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता शिवराज सिंह चौहानांनी उपोषणाचा मार्ग स्वीकाराला आहे.
मध्य प्रदेशात सलग चौथ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक गाड्या जाळल्या, तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर भाजपकडून काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यातच काँग्रेस नेत्यांच्या भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ समोर आल्याने भाजपच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.
याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही मध्य प्रदेशातील मंदसौरला आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राजस्थानच्या सीमेवर अडवलं. त्यानंतर राहुल गांधी पोलिसांना गुंगारा देऊन दुचाकीवर मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाले. मात्र पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं.