नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी मोदी सरकारने पुढच्या प्लॅनची तयारी केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर आता बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यासंबंधी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेतला जाऊ शकतो. निवडणूक प्रचारांमध्येही मोदींनी याबाबत संकेत दिले आहेत.

मालकी हक्काचे पुरावे न मिळाल्यानंतर सरकार बेहिशेबी मालमत्ता जप्त करणार आहे. सरकारने ताब्यात घेतलेली संपत्ती गरीबांच्या योजनांसाठी वापरली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

नोटाबंदीनंतर आयकर विभागाने आतापर्यंत 1833 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. काळ्या धनाविरोधातील ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचं सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्र यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार 2019 ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच लढवण्याचं धोरण आखत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 8 नोव्हेंबर हा काळा धन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाजप नोटाबंदीचे फायदे जनतेसमोर आणणार आहे.

दुसरीकडे विरोधकांनी देशभरात हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदी आता यावेळी पुन्हा एक मोठी घोषणा करणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

संबंधित बातमी : नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?