मुंबई: इच्छाशक्तिच्या जोरावर गगनालाही गवसणी घालता येते, हे वाक्य रांचीमधील मीराला अतिशय चपखल बसते. आठ वर्षांपासून बिल्डिंग उभारणीच्या ठिकाणी डोक्यावरून वीटा वाहून नेणाऱ्या मीराने प्रचंड परिश्रम करून दहावीच्या परिक्षेत उत्तम यश संपादन केले आहे.

 

मीराच्या दहावीमधील यशामुळे निर्मल कॉलेज प्रशासनानेही तिला प्रवेशासोबतच स्कॉलरशिप आणि राहण्यासाठी हॉस्टेलमध्ये व्यवस्था केली. कॉलेजच्या या सहय्योगासोबतच स्थानिक नागरिकांनीही तिला तीन लाखांची आर्थिक मदत देऊ केली.

 

मीराच्या वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. घराच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला वयाच्या आठव्या वर्षांपासून वीट वाहतूकीचे काम करावे लागत होते. 200 रुपयांच्या मोबदल्यासाठी तिला दिवसातील 12 तास काम करावे लागत होते. या पैशांच्या आधारेच तिने एका प्रायव्हेट शाळेत प्रवेश घेतला होता. कामामुळे एक दिवसआड शाळेत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करीत असे. पण तरीही तिने दहावीच्या परिक्षेत उत्तम यश मिळवले आहे.

 

मीराची आईही लहानसहान काम करून घर खर्च चालवते. तर तिच्या लहान बहीणीदेखील शिक्षणासोबतच मीराप्रमाणे काम करते.

 

आर्थिक परिस्थितीमुळे तिला डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला मुरड घालावी लागणार आहे. मात्र, तरीही जिद्दीच्या जोरावर तिने पोलीस भर्तीसाठी उतरण्याचा निर्णय केला आहे.