नवी दिल्ली : JEE या अभियांत्रिकी पात्रता प्रवेश परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे. 2017 पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड बंधनकारक असेल, असं लेखी उत्तर आज लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलं आहे.
JEE नंतर देशातल्या इतर परीक्षांसाठीही आधार कार्ड आवश्यक करण्याचा विचार चालू आहे. दुसरा कुणी विद्यार्थी परीक्षेला बसू नये, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गैरप्रकार रोखता येतील, असं सरकारचं म्हणणं आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टात आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असं सरकारला आधीच फटकारलेलं आहे. मात्र आम्ही बंधनकारक नाही, तर त्या योजनेचा सकारात्मक वापर करतोय, असा दावा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
JEE म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झॅम ही अभियांत्रिकी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. आयआयटी आणि एनआयटी या मोठ्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा हा मुख्य निकष ठेवण्यात आला आहे.