शंभर रुपये न दिल्याने अॅसिड हल्ला
Continues below advertisement
नवी दिल्ली : न्यू उस्मानपूर भागात 100 रुपये देण्यास मनाई केल्याने एका व्यक्तीने तरुणावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. तिघांनाही जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.
गौतम विहारमध्ये राहणारा 20 वर्षीय निशाण सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मेडिकल स्टोअरमध्ये औषधं आणण्यासाठी जात होता. निशाण उत्तर प्रदेशातील रामपूरमधील रहिवाशी आहे. औषधं आणायला जात असताना गल्ली नंबर 2 मध्ये राहणारा आसिफ त्याला भेटला. आसिफने निशाणला अडवून दारु पिण्यासाठी 100 रुपयांची मागणी केली.
यावेळी आसिफच्य हातात अॅसिडने भरलेली बॉटल होती. 100 रुपये देण्यास निशाणने नकार दिल्याने आसिफने शिव्या द्यायला सुरुवात केली. शिवाय, पैसे न दिल्यास अॅसिड फेकण्याची धमकीही आसिफने दिली. तरीह निशाणने आसिफला पैसे देण्यास नकार दिला.
आसिफ संतापला आणि त्याने अॅसिडने भरलेली बॉटल निशाणवर फेकली. अॅसिडची बॉटल फुटल्याने त्यातील अॅसिड निशाणच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर उडालं. त्यावेळी बाजूनेच जात असलेल्या एका दाम्पत्यावरही अॅसिड उडालं. त्यामुळे निशाणसोबतच बाजूने जात असलेलं दाम्पत्याही या हल्ल्यात जखमी झाले.
या घटनेनंतर त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली. गर्दीतीलच एका जणाने पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जगप्रवेश चंद हॉस्पिटलमध्ये तिन्ही जखमींना दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमींच्या तक्रारीवरुन आरोपी आसिफला पोलिसांनी अटक केली.
Continues below advertisement