आर्थिक फसवणुकीतल्या आरोपीची अर्धनग्न अवस्थेत धिंड
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2018 05:24 PM (IST)
महंमद रफिक देसाई हे सकाळी जिल्हा रुग्णालय आवारात आले असता लोकांनी त्यांना पकडले आणि त्यांचे कपडे काढून अर्धनग्न करून मारहाण केली.
बेळगाव : महानगरपालिकेच्या आश्रय योजनेतून घर मिळवून देतो म्हणून लाखो रुपये गोळा करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन शंभरहून अधिक लोकांनी एका व्यक्तीला अर्धनग्न करुन मारहाण केली आणि गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढली. मारहाण करुन धिंड काढण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव महंमद रफिक देसाई असे आहे. महंमद रफिक देसाई हे सकाळी जिल्हा रुग्णालय आवारात आले असता लोकांनी त्यांना पकडले आणि त्यांचे कपडे काढून अर्धनग्न करून मारहाण केली. नंतर त्यांच्या गळ्यात चप्पलाचा हार घालून जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धिंड काढण्यात आली. आश्रय योजनेतून घर मिळवून देतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी केला. पण महंमद रफिक देसाई यांनी वेगळाच खुलासा केला. आमदारांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याचा रागातून आपल्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्थानकात नोंदवली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात त्यांनी पंचवीस व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सकाळी रहदारीने गजबजलेल्या रस्त्यावरून धिंड काढल्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी थांबून चौकशी करत होते.महंमद रफिक देसाई याना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.