बेळगाव : खानापूर बिडी रस्त्यावरील हेब्बाळ गावानजीक बिडी बेळवणकी राज्य महामार्गावर आज सायंकाळी साडेसहा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात मुळचे ताडपत्री आंध्र प्रदेश आणि सध्या बंगळुरु येथे स्थायिक असलेल्या एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले.
या अपघातात दुलेखान एस (60), त्यांची सून हजरतबी (32), नातू झायद अब्बास (6) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर दुलेखान यांची पत्नी चांदबी (58) यांचा बेळगाव सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दुलेखान कुटुंबातील सदस्य गोवा फिरण्यास गेले होते. दोन दिवस प्रवास करुन आज कित्तूर मार्गे ते बंगळुरुला परत निघाले होते. दरम्यान हेब्बाळ गावाजवळ खड्डा चुकवताना कार अचानक ट्रकसमोर आली. अन कारच्या मधोमध भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुलेखान यांचा मुलगा कारचालक जहीर अब्बास (35) आणि मोठा नातू जुनेद अहमद (9) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.