मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांची टक्कर, केजरीवाल सुरक्षित
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2016 05:55 AM (IST)

अमृतसर (पंजाब) : अमृतसरमधील जालंधरजवळ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांची धडक झाली. मुख्यमंत्री केजरीवाल हे सुरक्षित असून, सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या गाडीमध्ये केजरीवाल बसले होते, त्याच गाडीच्या समोर अपघात झाला. या अपघातात केजरीवालांच्या गाडीचं बोनेटही फुटलं. त्यानंतर केजरीवालांनी गाडी बदलून दुसऱ्या गाडीने रवाना झाले. पंजाबमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आम आदमी पक्षाने तर अक्षरश: कंबक कसली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील बादल कुटुंबाला धारेवर धरलं आहे. त्याचसोबत काँग्रेस आणि भाजपविरोधातही केजरीवालांनी आपलं टीकास्त्र सोडलं आहे.