श्रीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्लाह यांनी भारतापासून वेगळे होण्याचा इशारा दिला आहे.


अब्दुल्लाह म्हणाले की, कलम 370 आणि कलम 35 अ हटवलं तर आम्हाला भारतापासून वेगळं होणं सोपं जाईल. तसेच आम्हाला स्वतंत्र होणेदेखील सोपे होईल. त्यांना (भाजपला)ते कलम हटवायचे आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरबाहेरचे लोक काश्मीरमध्ये राहू शकतील, येथे जमीन खरेदी करु शकतील. त्यामुळे ते (भाजप) काश्मीरमध्ये बाहेरची माणसं आणून इथे त्यांना वास्तव्य करायला देतील. हळूहळू आमची संख्या कमी होईल आणि बाहेरुन आलेल्या लोकांची संख्या वाढेल, पण तोवर आम्ही काय झोपा काढत बसणार आहोत का? असा सवालही अब्दुल्लाह यांनी भाजपला विचारला आहे.

अब्दुल्लाह म्हणाले की, अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्याशी दोन हात करु. 370 कलम ते कसं हटवतात ते पाहतोच, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वतंत्र होऊ आणि मी पाहतोच कोण यांचा झेंडा (तिरंगा)फडकावतो.

काय म्हणाले अब्दुल्लाह?
''ये क्या उसको हटाना चाहते हैं. सोचते हैं बाहर से लाएंगे, बसाएंगे, हमारा नंबर कम कर देंगे, हम सोते रहेंगे? हम उनका मुकाबला करेंगे, 370 को कैसे खत्म करेंगे? अल्लाह की कसम कहता हूं, अल्लाह को यही मंजूर होगा, हम इनसे आजाद हो जाएं. करें हम भी देखते हैं. देखता हूं फिर कौन इनका झंडा खड़ा करने के लिए तैयार होगा.''