मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर (Election) इंडिया आघाडी तुटणार असल्याचा दावा बीआरएस (BRS) पक्षाच्या नेत्या के. कविता (K. Kavita) यांनी केला आहे. 'एबीपी न्यूज'च्या (Abp News) 'द सदर्न रायझिंग समिट' कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. एबीपी न्यूज द सदर्न रायझिंग समिट 2023 चे उद्घाटन गुरुवारी (12 ऑक्टोबर ) रोजी झाले. या समिटमध्ये व्यवसाय, राजकारण, चित्रपट, क्रीडा, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकाच व्यासपीठावर आले. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांमधील प्रगती, सांस्कृतिक समृद्धी या विषयांवर या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
काय म्हणाल्या के कविता ?
के कविता यांनी या व्यासपीठावर इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले की इंडिया आघाडी तुटेल. तर यावेळी त्यांनी बीआरएसविषयी देखील भाष्य केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतीय राजकारणामध्ये कायमच तिसऱ्या खेळाडूचा उदय झाला आहे आणि तो तिसरा खेळाडू हा बीआरएस पक्ष आहे. दरम्यान 2024 निवडणुकांनंतर अन्नाद्रमुक हा पक्ष तुटु शकतो.'
के कविता यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बीआरएसच्या नेत्या के कविता यांनी यावेळी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'काँग्रेसने सत्तेत असताना कधीही जातीय जनगणना केली नाही. आता ते जातीय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. पण राज्यात बीआरएस पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर जातीय जनगणना करण्यात येईल.' दरम्यान के कविता यांनी आतापर्यंत जातीय जनगणना का झाली असा सवाल भाजपला देखील विचारला आहे.
काँग्रेसेच नेते के चिदंबरम यांचं प्रत्युत्तर
दरम्यान या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते के चिदंबरम देखील उपस्थित होते. त्यांनी के कविता यांनी केलेला दाव्यावर उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर मजबूत होईल. म्हणूनच इंडिया आघाडी कधीच तुटणार नाही.' आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांनी रणशिंगं फुंकलं आहे. त्यासाठी त्यांनी एकजूट केली असून त्यांच्या या एकजूटीला इंडिया आघाडी असं नाव देण्यात आलंय. तर या इंडियाच्या आघाडीवर बीआएस पक्षाकडून निशाणा साधण्यात आलाय.