नवी दिल्ली : यूपीमधील यादव कुटुंबात सुरु असलेल्या दंगलीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसनं केलेल्या सर्व्हेमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादवांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मात्र सपामध्ये दोन गट पडले तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेच्या जवळ जाऊ शकतं.


विशेष म्हणजे समाजवादी पक्षात एकी राहिली तर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्यात त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही. भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच फुटीच्या उंबरठ्यावर असलेला समाजवादी पक्ष एकसंध रहावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं त्याची माहिती अधिकृतरित्या समोर आली नाही. मात्र मुलायम पक्षाच्या संस्थापक अध्यक्षपदावर असतील तर अखिलेश राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला?

एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक म्हणजे 28 टक्के पसंती मिळाली आहे. मायावती यांना 21 टक्के जनतेने पसंती दिली आहे. भाजपच्या आदित्यनाथ यांना अवघी 4 टक्के, तर मुलायमसिंह यांना 3 टक्के जनतेने पाठिंबा दिला आहे.

कोणत्या भागात कोणाचा दबदबा?

एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात पूर्व यूपीमध्ये सपाला 35 टक्के, तर भाजपला 30 टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. तर बसपला 18 टक्के जनतेचा पाठिंबा आहे. पश्चिम भागात मात्र भाजपला घसघशीत म्हणजे तब्बल 37 टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. सपाला 16 तर बसपला 12 टक्के पसंती आहे.

सपामधील कलहाला जबाबदार कोण?

सपामधील कलहाला 6 टक्के नागरिकांनी अखिलेश यादव यांना जबाबदार ठरवलं आहे, तर एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात 25 टक्के जनतेने शिवपाल यांना जबाबदार मानलं आहे.

मायावती सरकारच्या तुलनेत अखिलेश सरकार चांगलं असल्याचं 41 टक्के जनतेला वाटतं. मुस्लिम मतदार सपाच्या बाजुने आहेत, तर दलित मतदार बसपच्या पाठीशी आहेत. सवर्ण आणि ओबीसी भाजपच्या सोबत असून ओबीसींपैकी यादव मात्र सपाच्या बाजुने आहेत.

कोणाला किती जागा?

सपाला 141 ते 151 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आणि युतीला 129-139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपला 93-103 तर काँग्रेसला 13-19 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी न्यूज-लोकनीति-सीएसडीएसच्या सर्वेक्षणात बांधण्यात आला आहे.

एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसने हे सर्वेक्षण 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत केलं. त्यावेळी मुलायम आणि अखिलेश यांच्यातील वाद इतके टोकाला गेले नव्हते. एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसने 65 विधानसभा क्षेत्रातील 5 हजार 932 नागरिकांशी संवाद साधला.