लखनऊ : एक जानवेरीला मुलायमसिंह यादव यांची स्वाक्षरी असलेली दोन पत्रकं प्रसिद्ध झाली होती. आता ही पत्रकं पुन्हा डोकं वर काढण्याचं कारण म्हणजे दोन्ही पत्रकांवर मुलायमसिंह यांच्या वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या आहेत.
दोन्हींपैकी एका पत्रकात किरणमयी नंदा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश होता आणि दुसऱ्या पत्रकात राम गोपाल यादव यांच्या हकालपट्टीवर संसदीय बोर्डाने दुजोरा दिल्याची माहिती होती. विशेष म्हणजे दोन्ही पत्रकांवर मुलायमसिंह यादव यांच्या वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, मुलायमसिंह यांच्या नावाने पत्रकांवर कुणी स्वाक्षरी केली होती?
एका पत्रकावर मुलायमसिंह यांचं नाव अर्धवट लिहिलं आहे, तर दुसऱ्या पत्रकावर मुलायमसिंह यांचं नाव पूर्ण आहे. त्यामुळे असाही प्रश्न आहे की, मुलायम सिंह यांच्या नावाने आणखी कुणी पत्रकावर स्वाक्षीरी करत आहे का?
दोन्ही पत्रकं बनावट - किरणमय नंदा
या सर्व प्रकरणासंदर्भात एबीपी न्यूजने जेव्हा समाजवादी पक्षातून हकालपट्टी केलेल्या किरणमय नंदा यांना विचारलं, त्यावेळी, दोन्ही पत्रकं बनावट असल्याचे नंदा यांनी सांगितले. किरणमय नंदा पुढे म्हणाले, "नेताजी (मुलायमसिंह यादव) यांची अशी स्वाक्षरी मी कधीच पाहिली नाही. माझ्याकडे त्यांचे अनेक पत्र आहेत. त्यामुळे ही दोन्ही पत्रकं बनावट आहेत."
कुणीतरी बनावट पत्रांद्वारे पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय - किरणमय नंदा
"कुणीतरी नेताजींच्या (मुलायमसिंह यादव) नावाने पत्रकं काढून पक्ष तोडू पाहतोय. नेताजींचा आम्ही आदर करतो आणि नेताजी कायमच आमचे नेते राहतील.", असे किरणमय नंदा यांनी सांगितले.
भावनांमुळे स्वाक्षरी वेगवेगळी - सीपी राय
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सीपी राय यांनी याबाबत बोलताना म्हणाले, "दोन्ही पत्रकांवरील स्वाक्षऱ्या भावनेच्या भरात केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही स्वाक्षऱ्या वेगवेगळ्या आहेत." शिवाय, जोपर्यंत स्वत: नेताजी पुढे येऊन या स्वाक्षरीचं खंडन करत नाहीत, तोपर्यंत या स्वाक्षऱ्या खऱ्या मानल्या जातील, असेही सीपी राय म्हणाले.
लोक नेताजींची दिशाभूल करत आहेत - उदयवीर सिंह
अखिलेश गटाचे समर्थक उदयवीर सिंह यांनी सांगितले, "काहीजण नेताजींची (मुलायमसिंह) दिशाभूल करत आहेत. पत्रकांवरील स्वाक्षरीही कुणीतरी वेगळ्या माणसाने केली आहे. कारण मला नाही वाटत भावनेच्या भरात स्वाक्षरी बदलू शकते."
किरणमय नंदा यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मुलायमसिंह यादव यांच्याशी त्यांनी दीर्घकाळ चर्चा केल्याचीही चर्चा आहे. शिवाय, मुलायमसिंह यांच्या घरातून कुणीतरी दुसराच त्यांच्या नावाने स्वाक्षरी करत असल्याचा आरोपही केला जातो आहे.
मुलायमसिंह हे साधारणत: पत्रकांवर 'मुलायमसिंह यादव' असं पूर्ण नाव लिहितात. हे नावच त्यांची स्वाक्षरी मानली जाते.
या सर्व प्रकारावर समाजवादी पक्षात अंतर्गत कोणतीही अद्याप चर्चा झालेली नाही.