नवी दिल्ली : पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप आपलं दहा वर्षांपासूनचं सरकार वाचवण्यात यशस्वी होणार का, काँग्रेस पंजाबमध्ये झेंडा फडकावणार का आणि दिल्लीतून जाऊन पंजाबमध्ये तळ ठोकून असलेले अरविंद केजरीवाल सत्तेत येणार का, या प्रश्नांचं उत्तर 11 मार्चला मिळणार आहे.


पंजाब विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीसाठी मतदान होणार आहे. तर 11 मार्चला निकाल आहे. मात्र त्यापूर्वी पंजाबच्या जनतेचा कौल एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने जाणून घेतला आहे.

कुणाला किती मतं मिळणार?

सर्व्हेनुसार 34 टक्के मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. अकाली दल आणि भाजपच्या युतीला 28 टक्के मतदारांचं समर्थन आहे, तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीवर 27 टक्के मतदारांनी विश्वास दाखवला आहे. शिवाय 10 टक्के मतदारांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?

डिसेंबरच्या तुलनेत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झालेली आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी सध्या तेच सर्वात लोकप्रिय उमेदवार आहेत. त्यांना 23 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. प्रकाश सिंह बादल यांना केवळ 19 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे, तर 23 टक्के मतदारांनी या प्रश्नावर मौन बाळगलं आहे.

निवडणुकीचा मुद्दा

सर्व्हेनुसार पंजाबमध्ये बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यानंतर विकास, ड्रग्स हे निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत. बेरोजगारीला 21 टक्के, विकास 18 टक्के तर 14 टक्के मतदारांनी ड्रग्स हा निवडणुकीचा मुद्दा असेल, असं म्हटलेलं आहे.

काँग्रेसला सिद्धूचा फायदा किती?

भारताचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळे पक्षाला पंजाबच्या माझा या भागात फायदा होऊ शकतो.

नोटाबंदीचा काय परिणाम?

सर्व्हेनुसार पंजाबच्या बहुतांश जनतेने नोटाबंदी हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. मात्र नोटाबंदीनंतर अंमलबजावणी चांगली झाली नाही, असं अनेकांचं मत आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा?

सर्व्हेमध्ये मतदारांशी बातचीत करुन जी टक्केवारी जमा करण्यात आली, त्याचं आकडेवारीमध्ये रुपांतर केलं तर काँग्रेसला 47 ते 55 जागा, अकाली-भाजपला 28-36 जागा, 'आप'ला 26 ते 34 जागा मिळू शकतात, असं सर्व्हेमधून समोर आलं आहे.

सर्व्हे कसा झाला?

एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने 15 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात 39 विधानसभा क्षेत्रातील 187 मतदान केंद्रांवरील 3 हजार 462 मतदारांचं मत जाणून घेतलं. युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजे ESOMAR यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा सर्व्हे करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

एबीपी सर्व्हे : उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येणार?


उत्तर प्रदेशात काँग्रेस-सप आघाडीचं वर्चस्व : एबीपी सर्व्हे