नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी 15 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 मार्चला नवीन सरकार सत्तेत येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आपला गड राखणार का, किंवा भाजपचं कमळ पुन्हा एकदा फुलणार का?, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांनी ओपिनियन पोल घेतला आहे.


कुणाला किती मतं मिळणार?

एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला 36 टक्के, तर भाजपला 39 टक्के मतदारांचं समर्थन आहे. तर बसपाला 6 टक्के आणि इतरांना 19 टक्के मतदारांचं समर्थन असेल.

मुख्यमंत्रीपदाची पहिली पसंत कोण?

एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांच्या सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून हरीश रावत सर्वात लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर ते जानेवारी या काळात हरीश रावत यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

31 टक्के मतदारांना मुख्यमंत्री म्हणून हरीश रावत हवे आहेत, तर 14 टक्के मतदारांनी बी. सी. खंडुरी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

निवडणुकीचा मुद्दा

सर्व्हेनुसार उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी विकास हाच एकमेव मुद्दा आहे. 33 टक्के मतदारांच्या म्हणण्यानुसार विकास हा निवडणुकीचा मुद्दा आहे. तर 16 टक्के मतदारांनुसार बेरोजगारी हा निवडणुकीचा मुद्दा आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा?

सर्व्हेमध्ये मतदारांशी बातचीत करुन जी टक्केवारी जमा करण्यात आली, त्याचं आकडेवारीमध्ये रुपांतर केलं तर भाजपला 32 ते 40 जागा, काँग्रेसला 24 ते 32 जागा आणि इतर पक्षांना 3 ते 9 जागा मिळू शकतात, अशी आकडेवारी सर्व्हेमध्ये समोर आली आहे.

सर्व्हे कसा झाला?

एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने 15 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात उत्तराखंडच्या जनतेची मतं जाणून घेतली. 20 विधानसभा क्षेत्रातील 98 मतदान केंद्रांवरील 1 हजार 845 मतदारांशी बातचीत करण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजे ESOMAR यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात आला आहे.