मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा, 18 लाख करदात्यांची चौकशी होणार
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2017 06:15 PM (IST)
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा केलेले 18 लाख खातेधारक आढळून आले आहेत. त्यांची कमाई आणि जमा केलेली रक्कम यात मोठा फरक आहे. तसंच त्यांच्या कमाईच्या तुलनेत त्यांनी भरलेला कर, यातही मोठी तफावत असल्याचं अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं. या 18 लाख खातेधारकांना आयकर विभागाकडून मेल आणि मेसेज पाठवून चौकशी केली जाणार आहे. या मेल आणि मेसेजला उत्तर न आल्यास त्यांना नोटिस पाठवण्यात येईल आणि हे खातेधारक समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलं. 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात आली होती. अनेकांनी आपली अघोषित संपत्ती त्यांचे कर्मचारी किंवा एजंटच्या माध्यमातून जनधन खात्यांमध्ये जमा केल्याचा सरकारला संशय आहे. जनधन खाते सरकारच्या योजनेंतर्गत शून्य रकमेवर उघडण्यात आले होते. बचत खात्यांमध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक आणि चालू खात्यात 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे. शिवाय 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा घरांचा किंवा जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवरही आयकर विभागाची नजर आहे.